पालकांच्या निग्रहामुळे शिक्षणक्षेत्रात बदलाचे नवे वारे
मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत आहे, इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, अशा चर्चा सातत्याने होत असताना अलीकडे पालक मराठी माध्यमाच्या शाळेला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवत असल्याचा नवा कल दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांत दोन लाख पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांतील शाळांमधून काढून मराठी माध्यमांच्या शाळेत टाकल्याची आकडेवारी आहे.
शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे की मराठी, हा मोठा चर्चेचा विषय आहे. जागतिक पातळीवर इंग्रजीचाच बोलबाला आहे. त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले, तरच ती त्या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊ शकतील अशा समजुतींसह फॅशन म्हणून कित्येक पालक मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश करून देतात. गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्याबरोबरच मराठी माध्यमाच्या शाळांची संख्याही पुरेशा पटसंख्येअभावी कमी झाली. मात्र आता हे चित्र बदलत आहे. मुलांना इंग्रजी माध्यमात शिकताना येणाऱ्या अडचणी, मुलांवरचे वाढते दडपण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. सध्या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना हा नवा कल दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment