देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या साथीत 90 च्या दशकातील धुंद करून सोडणारे संगीत जोडीला असेल तर त्याची मजाच निराळी, पण असे असले तरी, ऋतुमानातील बदलांचे वास्तव मात्र वेगळे आहे.मुख्यत्वे सर्वात मोठी जाणवणारी अडचण म्हणजे ऋतुमानानुसार येणारी आजारपणं. पावसाच्या जोडीला तीही चिकटूनच येतात. वातावरणातील बदलामुळे पावसाळ्यात नेहमी होणार्या या पाचआजारांकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी स्वतःला तयार केलं की अर्धी लढाई जिंकल्यासारखं असतं.
डेंग्यू : सकाळी लवकर किंवा पहाटेच्या वेळी चावणार्या डासांमुळे हा आजार पसरतो. त्यामुळे सततची डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना उद्भवतात. पोटदुखी, रक्तस्त्राव आणि चक्कर येणे अशी गुंतागुंतीची स्थितीही डेंग्यू हेमौरहजिक फिवर मध्ये उद्भवू शकते.
खबरदारी : डास चावू नयेत यासाठी कपडे, रीपलंट क्रीम याकडे विशेष लक्ष द्यावे.
उपचार - डेंग्यू झाल्यावर मोठ्या प्रमाणावरील गुंतागुंत टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप महत्त्वाचे असते. डेंग्युवर विशिष्ट उपचार नाहीत. लक्षणे बघून त्यानुसार उपचार ठरवावे लागतात.
मलेरिया : हा आजार अॅनोफेलस जातीच्या डासाच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि घामही येणे या गोष्टी सतत होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. यावर वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्याचे पर्यवसन कावीळ, प्रचंड अशक्तपणा किंवा कधीकधी तर मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्यातही होते.
खबरदारी- हा आजार डासांमुळे होतो. त्यामुळे तुमच्या राहण्याच्या जागेजवळ डासांची पैदास रोखणे गरजेचे असते. जोडीला मच्छरदाणी आणि डास घालविणार्या पदार्थांचा वापर केल्यास या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो.
उपचार - मलेरियाचे निदान पक्के झाल्यावर, डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे मलेरिया विरोधी औषधं सुरू करावी लागतात.
कॉलरा (पटकी) : दूषित अन्न, दूषित पाणी आणि अस्वच्छता यामुळे पसरणारा हा भयानक आजार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलट्या आणि जुलाब होतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण प्रचंड कमी होऊ शकते इलेक्ट्रोलाईट असंतुलन निर्माण होऊ शकते.
खबरदारी - हा आजार रोखण्यासाठी हातांचे आरोग्य सांभाळणे, अन्नपदार्थ स्वच्छ धुणे आणि शिजवणे महत्त्वाचे असते. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अन्नपदार्थ खायचे टाळा. केवळ गाळलेले आणि उकळलेले पाणीच प्या.
उपचार : शरीरातून सतत कमी होणारे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तोंडाने सतत द्रवपदार्थांचे सेवन सुरू ठेवणे गरजेचे असते. तोंडाने कमी द्रवपदार्थ जात असले आणि प्रचंड प्रमाणात उलट्या, जुलाब होत असतील तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात.
लेप्टोस्पायरोसिस : त्वचेवर कुठे कापले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांचा प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी यांच्याशी संपर्क झाला तर हा भयानक आजार उद्भवू शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्तस्त्राव किंवा मेंदूदाह इथंपर्यंत या रोगाची लक्षणे असू शकतात.
खबरदारी - प्राण्यांचे मलमूत्र असलेल्या दूषित पाण्याशी संपर्क टाळणे. जर तुम्ही शेती करत असाल किंवा स्वच्छता कामगार म्हणून काम करत असाल तर पुरेसे संरक्षणात्मक कपडे अंगावर घाला.
उपचार - निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट प्रतिजैविके घ्यावीत.
हिपेटायटीस : विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होते (पिवळे डोळे आणि त्वचा, गडद रंगाचे मूत्र) तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्तपणा जाणवतो.
खबरदारी - स्वच्छ, सुरक्षित पाणी आणि सकस आहार आवश्यक असतो. हातांचे आरोग्य खूप महत्त्वाचे असते.
उपचार - यासाठी विशिष्ट उपचारपद्धती आहे. लक्षणांनुसार उपचार ठरवले जातात. पुढे जाऊन होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.
इतर उपाय : स्वच्छ (गाळलेले किंवा उकळलेले) पाणी प्या.
खोकताना वा शिंकताना तुमचे तोंड आणि नाक रुमालाने झाकून घ्या.
घरात आत असताना मच्छरदाणी किंवा डास घालविणार्या पदार्थांचा वापर करा. बाहेर असताना डास चावू नयेत म्हणून वापरण्यात येणारं क्रीम लावा.
पाणी साचू देऊ नका.
त्वचेला फंगल (बुरशीसारखे) संसर्ग टाळण्यासाठी कोरडे कपडे घाला.
ताजे, शिजवलेले अन्न खा आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
No comments:
Post a Comment